श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर हल्ला झाला. त्यामध्ये एका जवानाला वीरमरण आलं. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू असताना एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. ती घटना पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्या मृत व्यक्तीचा तीन वर्षांचा नातू तिथेच होता. आजोबांना जमिनीवर निपचित पडलेलं पाहून नातू त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र आजोबा उठत नसल्याचं पाहून तो रडू लागला. दरम्यान दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता. त्यामुळे त्या चिमुरड्याच्या जीवालाही धोका होता.चिमुकल्याचा जीव संकटात असल्याचं पाहून सीआरपीएफचा जवान त्याचा जीव वाचवण्यासाठी धावला. त्याला चिमुरड्याला एका हातात घेतलं आणि सुरक्षित ठिकाणी नेलं. चिमुकल्याला घेऊन जात असलेल्या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये चिमुकल्याच्या चेहऱ्यावरची निरागसता, त्याच्या डोळ्यातले अश्रू आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या जवानाच्या चेहऱ्यावरील भाव अगदी स्पष्टपणे दिसत आहेत.
कडक सलाम! दहशतवाद्यांकडून तुफान गोळीबार सुरू असताना चिमुरड्यासाठी धावला सीआरपीएफ जवान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 12:57 PM