श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या एका गाडीवर काही आंदोलनकर्त्यांनी निशाणा साधला आहे. हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावरून निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या गाडीखाली तीन जण चिरडल्याची माहिती मिळते आहे. या घटनेनंतर श्रीनगरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी मेहबुबा मुफ्ती सरकारवर कडाडून टीका केली. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, गाडीखाली येऊन जखमी झालेल्या तीन जणांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रीनगरमधील नोहटा भागातील ही घटना आहे. या घटनेचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ठरलेल्या ठिकाणी सोडल्यानंतर सीआरपीएफची गाडी परतत होती. ती गाडी आंदोलनकर्त्यांच्या गर्दीत सापडली. दरम्यान, ही घटना का व कशी घडली याबद्दल ठोस माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये एक गाडी गर्दीत अडकल्याचं पाहायला मिळतं आहे. लोक गाडीचा रस्ता रोखताना दिसत आहेत. त्या गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न ड्रायव्हर करताना दिसतो आहे. दुसऱ्या एका व्हिडीओत तेथिल लोक गाडीवर दगडफेक करताना दिसत आहेत. तसंच एका जखमी व्यक्तीला बाजूला करताना व्हिडीओत पाहायला मिळतं आहे.
दरम्यान, काही दिवसातच गृहमंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत पण त्याआधीच ही घटना घडली आहे. काश्मीरी तरूणांपर्यंत पोहचण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना यामुळे ब्रेक लागण्याची शक्यकता आहे. दरम्यान, रमजानच्या महिन्यात दहशतवाज्याविरोधात मोहित सुरू ठेवू नका, असे आदेश काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने दिले होते.