हरियाणातील बहादूरगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भीषण अपघातात पतीच्या अस्थी विसर्जनासाठी जाणाऱ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहादूरगडमधून जाणाऱ्या केएमपी एक्स्प्रेस वेवर ही घटना घडली.
भरधाव वेगाने जाणारी क्रूझर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली, त्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील 11 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी बहादुरगड रुग्णालयात आणण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पीजीआय रोहतक येथे पाठविण्यात आले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बहादुरगड रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
बहादूरगडच्या जाखोडा गावाजवळील उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. गीता असं मृत महिलेचं नाव असून ती गुजरातची रहिवासी आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता यांच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते आणि गीताचं संपूर्ण कुटुंब हरिद्वारला गंगेत अस्थी विसर्जित करण्यासाठी जात होते. बहादूरगडच्या जाखोडा गावाजवळ पोहोचल्यावर त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली.
या अपघातात गीता यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी या भीषण अपघातात त्यांच्या कुटुंबातील 11 सदस्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पीजीआय रोहतकमध्ये पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बहादूरगड पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. जखमींचे जबाब घेतल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.