नवी दिल्ली : सरत्या वर्षाच्या अखेरीस देशातील ४८२ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. २०१९ च्या डिसेंबरमध्ये ४३९ कारखाने सुरू होते. यंदा त्यात वाढ झाल्याने २०२० पेक्षा नववर्षात ३० लाख टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता आहे.
आजपर्यंत ११५१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ते गतवर्षी आजच्या दिवसापर्यंतच्या तुलनेत ३६१ लाख टन जास्त आहे. सरासरी साखर उतारा ९.४३ टक्के असला तरी १०८ टन साखर जास्त झाली आहे. उत्तर प्रदेशात उसाचे गाळप ३३१ लाख टन झाले. कर्नाटकातील ६५ कारखान्यांमधून २६१ लाख टनाचे गाळप झाले असून त्यातून सरासरी ८.९५ टक्के उताऱ्याने २३.४० लाख टन जास्त साखर झाली आहे. त्यापाठोपाठ गुजरात, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश ,पंजाब, तामिळनाडू , उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा क्रमांक येतो.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने यावर म्हटले आहे की, इथेनॉलचे वाढीव दर, तेल कंपन्यांकडून खरेदीची हमी तसेच पुरवठा तारखेपासून २१ दिवसांत पूर्ण पैसे देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. सरकारच्या बदलेल्या धोरणामुळे साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती करण्याची भूमिका घ्यावी. साखर निर्यात करून शिल्लक साठे, त्यात अडकलेली रक्कम व त्यावर चढणाऱ्या व्याजाच्या बोझ्यापासून सुटका करून घ्यावी. कारण, साखर निर्यात योजना हळूहळू कमी होणार असून २०२२-२३ नंतर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार बंद होईल.
गाळपामध्ये व साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून गतवर्षीच्या १६५ लाख टनाच्या तुलनेत डिसेंबर २०२० अखेर ४२१ टनाचे गाळप झाले असून त्यातून ४० लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले. मात्र, महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा २०१९ साली १० टक्के होता तो डिसेंबर २०२० मध्ये अर्ध्या टक्क्याने घटला.