नवी दिल्ली : टि्वटर तसेच अन्य सोशल मीडियावर क्रिप्टो करन्सीचे घोटाळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. क्रिप्टो करन्सीशी संबंधित व्यवहार करणाऱ्यांची खाती टि्वटरवर चालणाऱ्या बनावट खात्यांशी खातेदारांच्या नकळत काही शर्विलकांनी जोडली. त्यामुळे खातेदारांना त्यातही युवा गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सी व्यवहारात फटका बसला आहे. काही क्रिप्टो खाती ही अॅडोरेबल रिप्रेझेन्टेटिव्ह एमसी फॉर यूथ (आर्मी) या प्रणालीशी खातेदारांच्या नकळत जोडली गेली. तिथे अगदी प्राथमिक व्यवहार २५ ते २५० डॉलरच्या टप्प्यात आहेत.
क्रिप्टो चलन व्यवहारात यश कसे मिळवायचे याचे कथित मार्गदर्शन करणाऱ्या लिंकही आर्मीवर क्रिप्टो करन्सीच्या खातेदारांना पाहायला मिळतात. त्यातूनही त्यांची फसवणूक होत असते. या आभासी चलन व्यवहाराचे युवकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षण असते. त्यामुळे त्यांना गंडा घालण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. क्रिप्टो करन्सीचे व्यवहार करणाऱ्यांची संख्या जगभरात वाढत आहे. मात्र, टि्वटरवर अनेक बनावट खाती उघडून त्याद्वारे गुंतवणूकदारांची दिशाभूल तसेच फसवणूक केली जाते. काही कम्युनिटींकडून हे प्रकार सोशल मीडियावर सर्रास सुरू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बिटक्वाइनचे मूल्य ५३ हजार डॉलरवर
टेस्ला आयएनसीने बिटक्वाइनमध्ये केलेल्या १.५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे अब्जाधीश एलन मस्क यांनी एक ट्वीट करून जोरदार समर्थन केल्यामुळे बिटक्वाइनचे मूल्य ५३ हजार डाॅलरवर पोहोचले आहे. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सरकारे अर्थव्यवस्थेत प्रचंड प्रमाणात रोख ओतीत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. चलनवाढीचा भडका उडण्याची भीती सतावत आहे. गुंतवणुकीच्या पर्यायी मार्गांचा शोध ते घेत आहेत. मस्क यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले की, क्रिप्टोकरन्सी हा रोखीचा कमी मूर्खता असलेला पर्याय आहे.