शरद गुप्तालाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्व डीम्ड (मानद), राज्य आणि खासगी विद्यापीठांनी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रेस एग्झामच्या (सीयूईटी) माध्यमातून पदवी प्रवेश द्यावेत, असा सल्ला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष प्रोफेसर जगदीश कुमार यांनी सर्व विद्यापीठांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सिंगल विंडो पदवी प्रोग्रामअंतर्गत प्रवेश द्यायला हवे. त्यासाठी त्यांनी सीयूईटी २०२२ मध्ये भाग घ्यायला हवा किंवा मेरिटनुसार पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश द्यावा.
यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, वेगवेगळ्या राज्यातील शिक्षण बोर्डाची परीक्षा आणि मूल्यांकनाची पद्धत याचा परिणाम विद्यापीठ प्रवेश परीक्षेवर होणार नाही. काही शिक्षण बोर्डात १०० टक्के गुण मिळविणे कठीण आहे तर, काही राज्यांत टॉपर ८० ते ८५ टक्क्यांवर असतात. सीयूटीमुळे हे अंतर दूर होईल. आतापर्यंत ही परीक्षा केवळ केंद्रीय विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी होत होती. मात्र, यूजीसीला असे वाटते की, खासगी आणि राज्य विद्यापीठातही या परीक्षा पद्धतीनुसार प्रवेश द्यावा.
हा होणार फायदा सीयूईटीच्या माध्यमातून प्रवेश दिल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेशासाठी वेगवेगळे अर्ज करावे लागणार नाही, वेगळ्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही चांगली संधी उपलब्ध होईल. आतापर्यंत देशात वेगवेगळ्या विद्यापीठात प्रवेशासाठी वेगळी पद्धत होती.