ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - गुन्ह्यात दोषी ठरलेल्या लोकांचाही आत्मसन्मान असतो,त्यांना ताबडतोब किंवा गोपनीय पद्धतीने फाशी दिली जाऊ शकत नाही असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. दोषी ठरलेल्यांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला परवानगी दिली पाहिजे असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
उत्तरप्रदेशमध्ये २००८ मध्ये महिलेने तिच्या प्रियकराच्या साथीने तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. कुटुंबाचा प्रेमसंबंधांना विरोध असल्याने त्या महिलेने कुटुंबालाच संपवले होते. याप्रकरणी संबंधीत महिला व तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा झाली होती. याविरोधात दोषी ठरलेल्या महिलेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाचे न्या. ए.के. सिकरी व यू. यू ललित यांच्या खंडपीठाने या दोघांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने गोपनीय पद्धतीने दोषींना शिक्षा देता येत नाही असे स्पष्ट केले. एखाद्याला फाशीची शिक्षा सुनावल्यावर संविधानातील कलम २१ नुसार जीवन जगण्याचा अधिकार लगेच संपत नाही. त्या व्यक्तीच्या आत्मसन्मान व प्रतिष्ठेचे रक्षण केलेच पाहिजे असे कोर्टाने नमूद केले.