नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले होते. याला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत पोलिसांनी दिल्लीतील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी योग्य कामगिरी केल्याचे सांगत दिल्ली पोलिसांचे कौतुक केले.
"मी राजकीय व्यक्ती आहे. देशाचा गृहमंत्री आहे. माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. मात्र, दिल्ली पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. कारण, दिल्ली पोलिसांनी संपूर्ण ताकदीने दंगलीवर नियंत्रण मिळविले आणि 13 टक्के लोकांना बाहेर जाऊ दिले नाही. ही पोलिसांची यशस्वी कामगिरी आहे. त्यामुळे पोलिसांवर आरोप करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करू नका", अशा शब्दांत अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले आहे.
याचबरोबर, अमित शाह म्हणाले, "700 हून अधिक जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. जलदगतीने कारवाई होत आहे. 2600 जणांना पुराव्याच्या आधारावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. काल 1170 जणांची ओळख पटली होती. आतापर्यंत 1170 जणांची ओळख पटली आहे. 24 फेब्रुवारीच्या रात्री उत्तर प्रदेशची सीमा बंद करण्यात आली होती".
"दिल्ली हिंसाचाराआधी 22 फेब्रुवारीला काही सोशल मीडियावर अकाऊंट तयार करण्यात आले आणि 26 फेब्रुवारीला बंद करण्यात आले. हे करणारे लोक कोठेतरी बसले असतील आणि माझे म्हणणे ऐकत असतील. त्यांना वाटत असेल की आपण वाचू शकू. मात्र, मी स्पष्ट करू इच्छितो की त्यांना पाताळातून शोधून काढू", अशा शब्दांत अमित शाह यांनी दिल्ली हिंसाचारात हात असणाऱ्यांना राज्यसभेतून ठणकावले आहे. तसेच, दिल्ली हिंसाचार प्रकरणातील 1100 हून अधिक लोकांची ओळख पटली आहे. ज्यामध्ये 336 लोक उत्तर प्रदेशातून आले होते. याचे पुरावे सुद्धा आहेत, असा दावा अमित शहा यांनी केला आहे.