गुवाहाटीः नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर आसाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला होता. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा करत राज्य सरकारनं कर्फ्यू हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व कायदा लागू केल्यानंतर बंद करण्यात आलेली इंटरनेटची ब्रॉडबँड सेवा मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली कायदा-सुव्यवस्थेच्या फेरआढाव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 11 डिसेंबरपासून लागू करण्यात आलेला कर्फ्यू मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून हटवण्यात आला आहे. नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसामसह ईशान्य भारतातील इतर राज्यांत पेटलेल्या आंदोलनाची धग कायम आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. तसेच बाजारपेठा, दुकाने सर्व बंद होती. वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात आंदोलनाने सर्वात रौद्र रूप आसाममध्ये धारण केले होते. तिथे निदर्शनांमुळे सर्व रस्ते बंद करण्यात आल्यानं काही रेल्वे स्थानके व विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे.
CAA Protest : आसाममधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर; आजपासून कर्फ्यू मागे, इंटरनेट सेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 7:45 AM