उडुपी : कर्नाटकमध्ये हिजाबबंदीच्या मुद्यावरून वातावरण तापले असून, उडुपी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांच्या आजूबाजूच्या परिसरात सोमवारपासून ते १९ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
हिजाबबंदी वादामुळे राज्य सरकारने शाळा बंद ठेवल्या होत्या. आता त्या सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली. शाळांपासूनच्या २०० मीटरच्या परिसरासाठी हा आदेश जारी करण्यात आला. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शाळांच्या परिसरात घोषणा देणे, गाणी म्हणणे, भाषणे करण्यासही बंदी घालण्यात आली.
या राज्यात उद्या, १४ फेब्रुवारीपासून शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे लोकांनी शांतता राखणे आवश्यक आहे, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे.
भाजपचा ध्रुवीकरणाचा डाव : सलमान खुर्शीदपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिजाबबंदी तसेच समान नागरी कायदा यासारखे मुद्दे उपस्थित करून भाजपचा समाजात ध्रुवीकरण घडवून आणण्याचा डाव आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केला आहे. ते म्हणाले की, भाजपची मतदारांवरची पकड सैल झाली आहे. मतदारांना जवळ आणण्यासाठी भाजप अनेक डावपेच लढवत आहे.