श्रीनगर : मोहरमच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरच्या काही भागात बुधवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात ९६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, श्रीनगरच्या पाच पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात शुकशुकाटच होता.या वातावरणामुळे व्यापारी व व्यावसायिक कंटाळून गेले आहेत. त्यांचे आतापर्यंत करोडो रुपयांचे नुकसान झाले असून, हा प्रकार किती दिवस चालणार, हे कळेनासे झाल्याने त्यांनी जम्मू तसेच अन्य शहरांमधून वस्तू मागविणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारात जीवनावश्यक वस्तू तसेच औषधे यांचीही चणचण भासू लागली आहे. काही व्यापारी श्रीनगरमधून बाहेर निघून गेले असून, काहींनी जिथे पर्यटन व्यवसाय जोरात आहे, तिथे आपली तात्पुरती दुकाने थाटली आहेत. केरळमध्येही बरेच व्यापारी गेले आहेत.मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नौहट्टा, खानयार, रैनावारी, सफकदल आणि महराजगंज पोलिस ठाण्याच्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, सौरा, लाल बाजार, जडीबल आणि निगीन या चार पोलिस ठाण्याच्या अंतर्गत संचारबंदीसदृश प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
श्रीनगरच्या काही भागात संचारबंदी
By admin | Published: October 13, 2016 6:20 AM