श्रीनगर : पेलेट गनमुळे जखमी झालेल्या १२ वर्षी मुलाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जुनैद आखून असे मृत मुलाचे नाव आहे. सौरा येथील एसकेआयएम हॉस्पिटलमध्ये काल रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याबरोबर काश्मिरातील हिंसाचारात मृत्यू पावलेल्यांची संख्या ८४ झाली आहे. सफकदल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सैदापोरा येथे करण्यात आलेल्या एका हिंसक आंदोलनात जनैदला डोक्यात पेलेट लागली होती. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाच्या मृत्यूनंतर लगेच सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली. ती आज कायम ठेवण्यात आली. संचारबंदी असलेल्या पोलिस ठाण्यांत नौहत्ता, खानयार, रैनावारी, सफकदाल, महाराज गंज, मैसुमा आणि बटमालू यांचा समावेश आहे. उर्वरित काश्मिरात जमावबंदी आदेश लागू आहे. सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे. ८ जुलै रोजी हिजबुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर बुऱ्हाण वाणी याचा सुरक्षा दलांनी खातमा केला होता. त्यानंतर काश्मिरात हिंसाचार उसळला. सलग ९२ व्या दिवशी राज्यात तणाव आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ८४ लोक मारले गेले आहेत. त्यात २ जवानांचा समावेश आहे. याशिवाय हजारो लोक जखमी झाले आहेत. तरी तणाव निवळण्याची चिन्हे नाहीत. दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप, शैक्षणिक संस्था बंद आहेत. रस्त्यावरील सार्वजनिक वाहनेही बंद आहेत. श्रीनगर शहरांतील रस्त्यांवर शनिवारी शुकशुकाट दिसून आला. अल्प प्रमाणात खाजगी वाहने धावताना दिसून आली. त्यांची सुरक्षा दलांकडून तपासणी करण्यात येत होती. (वृत्तसंस्था)जम्मूच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्यात वाढ- पाकिस्तानने गेल्या दोन दिवसांमध्ये जम्मूला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मोठ्या प्रमाणात सैन्य आणून ठेवले असून, पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेकडील भागांत राहणाऱ्या रहिवाशांना तेथून अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही रहिवाशांच्या स्थलांतराला पाकिस्तानचे लष्कर स्वत:च मदत करीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.आतापर्यंत जम्मूकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागांतही पाकिस्तानतर्फे शस्त्रसंधीचे अनेकदा उल्लंघन झाले आहे. तसेच तेथून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्या भागातही भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राइक्स होतील, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. तसे प्रत्यक्षात घडलेच, तर त्याला तोंड देता यावे, यासाठी सैन्याची अधिक कुमत तिथे तैनात करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांना स्ट्राइक्सचा त्रास होता कामा नये आणि त्यांच्यामार्फत कोणतीही गुप्त माहिती बाहेर जाता कामा नये, यासाठीच लोकांचे स्थलांतर केल्याचे सांगण्यात येत आहे.सीमेवरील हमीरपूरला शांततेची आस- पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारामुळे गाव सोडून आलेल्या सीमा भागातील हमीरपूर या गावातील नागरिकांना दोन्ही देशांत शांतता निर्माण होईल, अशी आशा वाटतेय. त्यांना आपल्या घराकडे परत जाण्याची आस लागून राहिली आहे. घरेदारे, उभी पिके आणि गुरेढोरे असे सगळे सोडून हे लोक गावातून परागंदा झाले आहेत. हमीरपूरमध्ये प्रवेश करताच नजरेस पडतात कुलूपबंद घरे आणि भयाण शांतता; पण अचानक फुटलेला तोफगोळा या भयाण शांततेच्या काळजावर अचानक घाव घालतो. गुराढोरांची काळजी घेण्यासाठी गावात मागे थांबलेला तारसेन लाल याची भेट झाली. - ४२ वर्षीय लाल म्हणाले की, बोलायच्या आधी या भिंतीच्या आडोशाला या. केव्हा तोफेचा एखादा गोळा येऊन आदळेल काही सांगता येत नाही. हमीरपूर हे गाव नियंत्रण रेषेपासून हाकेच्या अंतरावर आहे. भारत-पाकमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर येथील लोक गाव सोडून जम्मूमध्ये स्थलांतरित झाले. प्रशासनाने उभारलेल्या निर्वासित छावणीत त्यांनी आश्रय घेतला आहे. छावणीतून दररोज दोन लोक गावात येऊन गुरांना चारा-पाणी करतात. अर्थात यात जिवाची जोखीम आहेच. लाल यांच्यासोबत कुलबीर सिंग (५४) नावाचे आणखी एक गृहस्थ गुरांच्या चारा-पाण्यासाठी आले आहेत. त्यांनी सांगितले की, लोकांना शांतता हवी आहे. त्यांना आपल्या घरी परतायचे आहे. - मेहनतीने बांधलेल्या आपल्या घरापासून दूर राहायला कोणाला आवडते. दोन्ही देशांत जेव्हा केव्हा तणाव निर्माण होतो, तेव्हा आम्हाला घरे सोडून जावे लागते, हे आमचे दुर्दैवच आहे. सरकारने माणसांसाठी राहण्याची सोय केली; पण जनावरांच्या चारापाण्याची कोणतीही सोय केलेली नाही. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून येथे आलो नाही, तर ही जनावरे चारा-पाण्यावाचून मरून जातील. मुलीचा विवाह कसा होणार?निर्वासितांच्या छावणीत ६४ वर्षीय शीला देवी यांनी सांगितले की, माझ्या मुलीचे पुढील महिन्यात लग्न आहे. आम्ही लग्नाची तयारी करीत होतो. घराची रंगरंगोटी हाती घेतली होती; पण भारत-पाक तणावाने सारेच विस्कटले आहे. परिस्थिती न सुधारल्यास निर्वासितांच्या छावणीतच आम्हाला मुलीचे लग्न करावे लागेल. तसे झालेच तर आम्ही सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करू. कारण इथे आम्ही लग्नासाठी पैसे उभे नाही करू शकत.
मुलाच्या मृत्यूनंतर पुन्हा श्रीनगरमध्ये संचारबंदी
By admin | Published: October 09, 2016 12:30 AM