श्रीनगर : काश्मीरमध्ये अनेक वर्षांनंतर मंगळवारी सर्व दहा जिल्ह्यांत ईदच्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली असून, हेलिकॉप्टर आणि ड्रोनने टेहाळणी करण्यात येत आहे. राज्यात १९९० मध्ये दहशतवाद वाढू लागल्यानंतर ईदच्या काळात संचारबंदी लागू करण्यात आली होती. सुरक्षा दल आणि आंदोलक यांच्यात झालेल्या हिंसाचारात मंगळवारी आणखी दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील मृतांची संख्या आता ८0 वर पोहचली आहे. आजच्या या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. काश्मिरात हिंसाचार भडकला तर सैन्य हस्तक्षेप करेल. सैन्याला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोेमवारी मध्यरात्रीपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फुटीरवाद्यांकडून हिंसाचाराची शक्यता पाहता सुरक्षा दलांना मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहे. विरोध प्रदर्शनाच्या काळात फुटीरवादी मुलांचा वापर ढालीसारखा करीत असल्याने तरुणांना फुटीर आंदोलनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २६ वर्षांनंतर प्रथमच येथे ईदगाह आणि हजरतबल मशिदीत ईदची नमाज आयोजित करण्यात आली नाही. सूत्रांनी सांगितले की, नागरिकांना स्थानिक मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तणावपूर्ण स्थितीमुळे सरकारने सर्व टेलिकॉम नेटवर्कच्या इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. मोबाईल सेवा आगामी ७२ तास बंद राहणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ईदच्या दिवशी संचारबंदी, दगडफेक
By admin | Published: September 14, 2016 5:30 AM