श्रीनगर : परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे काश्मीरच्या चार जिल्ह्यांसह श्रीनगर शहराच्या काही भागांतील संचारबंदी शनिवारी उठविण्यात आली. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून खोऱ्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी सुरूच आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह येथे दाखल झाले असून ते विविध पक्ष, संघटनांच्या शिष्टमंडळांना भेटणार आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे.बांदीपोरा, बारामुला, बडगाम आणि गांदरबाल जिल्ह्यासह श्रीनगर शहराच्या काही भागात परिस्थिती सुधारल्यामुळे तेथील संचारबंदी उठविण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ज्या भागातील संचारबंदी उठविण्यात आली तेथे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. खोऱ्यातील अनंतनाग, कुलगाम, कुपवाडा, पुलवामा आणि शोपिया जिल्ह्याासह शहरातील आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी अद्यापही लागू आहे. तूर्तास खोऱ्यात शांतता आहे. वरिष्ठ पोलीसअधिकाऱ्यांना हलवलेश्रीनगर : हिजबुल मुजाहिदीनच कमांडर बुऱ्हाण वाणी मारला गेल्यानंतर सर्वाधिक हिंसाचार झालेल्या दक्षिण काश्मीरातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. दक्षिण काश्मीर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक नितीश कुमार यांची बदली करून त्यांच्या जागी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी गुलाम हसन भट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनंतनागचे पोलीस अधिक्षक अब्दुल जब्बार यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ग्रामीण वाहतूकचे पोलीस अधिक्षक झुबैर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)गृहमंत्र्यांनी विश्वासनिर्मितीचे उपाय घोषित करावेत- काँग्रेसनवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह काश्मीर खोऱ्याच्या दौऱ्यादरम्यान विश्वासनिर्मीतीच्या उपायांसह निदर्शकांविरुद्ध आता पेलेट गनचा वापर न करण्याचीही घोषणा करतील, अशी आशा काँग्रेसने व्यक्त केली आहे. काश्मीरमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करून काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी नरेंद्र मोदींवरही हल्ला केला. काश्मीर मुद्यावर चर्चा सुरू असताना मोदी राज्यसभेत तसेच लोकसभेत नव्हते. त्यावरून त्यांना व त्यांच्या सरकारला काश्मीरी लोकांची अजिबात पर्वा नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. आता १६ दिवसानंतर गृहमंत्री काश्मीरला गेले आहेत. जनतेसमोर ते यापुढे काश्मीरात पेलेट गनचा वापर केला जाणार नाही अशी घोषणा करतील, अशी मला खात्री आहे. काश्मीरी लोकांनी केंद्र व राज्य सरकारांवर पुन्हा विश्वास ठेवावा यासाठी गृहमंत्री विश्वासनिर्मीतीचे उपाय घोषित करतील, अशी मला आशा आहे. घुसखोरीचा प्रयत्न उधळला : काश्मीरात लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी चकमक होऊन एक सैनिक शहीद झाला. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना सैनिकांनी रात्री आव्हान दिले. यावेळी गोळीबार झाला व अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले. चकमकीदरम्यान एक सैनिक जखमी झाला होता. उपचारादरम्यान नंतर त्याचे निधन झाले. उच्च न्यायालय सुरूचजम्मू : हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारामुळे जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय बंद होते या वृत्ताचे न्यायालयाच्या निबंधकांनी खंडन केले आहे. उच्च न्यायालयाची दोन्ही पीठे आणि विशेष करून काश्मीर पीठ पुर्णपणे कार्यरत होते, असे निबंधक एम. के. हंजूरा यांनी सांगितले. अशांततेमुळे न्यायालय बंद असल्याचे वृत्त निखालस खोटे आहे. काश्मीरात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वकिलांनी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय बंद असल्यामुळे येथे यावे लागल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.
काश्मीरच्या चार जिल्ह्यांत संचारबंदी उठविली
By admin | Published: July 24, 2016 2:31 AM