मुंबई : डिजिटल पेमेंटचा टक्का वाढवून संपूर्ण अर्थव्यवस्थाच डिजिटल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असतानाच देशात चलनातील नोटांचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढल्याचे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या २०१९ च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. या वाढीनंतर मार्च २०१९ अखेरीस चलनात २१.१० लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा होत्या, असे अहवालात म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, चलनातील नोटांची संख्याही (व्हॉल्यूम) ६.२ टक्क्यांनी वाढली आहे. वित्त वर्ष २०१९ च्या अखेरीस चलनात १,०८,७५९ दशलक्ष नोटा होत्या. ५०० रुपयांच्या नोटांना सर्वाधिक मागणी आहे. चलनात असलेल्या नोटांच्या मूल्यापैकी तब्बल ५१ टक्के मूल्य ५०० रुपयांच्या नोटांचे आहे.
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच व्यवहारातील रोख रकमेचा वापर कमी करण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी केली होती. ५०० व १,००० रुपयांच्या नोटा सरकारने तेव्हा बंद केल्या होत्या. त्यामुळे चलनातील ८६ टक्के नोटा बाद झाल्या होत्या. एवढे होऊनही व्यवहारातील रोख रकमेचा वापर कमी होण्याऐवजी वाढला असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून दिसून येत आहे.