- लोकमतच्या शतक महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण
नवी दिल्ली : लोकशाहीत प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी आहे. वर्तमान परिस्थितीत ही जबाबदारी अजून वाढलीच आहे, अशी भावना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या बैठकीचा संदर्भ देत मनमोहनसिंग यांच्या राष्टÑनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह लावले होते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग माध्यमांच्या कार्यक्रमात काय बोलतात, याकडे उपस्थित सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्या वादाचा उल्लेखही न करता डॉ. सिंग यांनी माध्यमांनी सत्याची कास धरावी असे आवाहन केले.‘लोकमत’ शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण डॉ. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, लोकमतने राष्टÑजीवनाच्या उभारणीत भरीव योगदान दिले आहे.हेच योगदान भविष्यातही देण्याचे आवाहन त्यांनी केले. एका अमेरिकन पत्रकाराचा संदर्भ देत ते म्हणाले की, कोणत्याही बातमीच्या मागे दडलेले सत्य हे कधीच समोर आणल्याशिवाय कळत नाही, माध्यमांनी ते सत्य समोर आणण्याचे मोठे काम तटस्थपणे केले पाहिजे. ते करत असताना, त्याच्या बातम्या देत असताना त्यात त्यांनी आपली मत मतांतरे आणू नयेत. लोकमतने सत्य समोर आणण्यासाठीचे काम याच तटस्थपणे यापुढे ही चालू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.देशातील प्रतिष्ठित दैनिक लोकमत आता राष्टÑीय राजधानीतून प्रकाशित होणार, ही अभिनामाची बाब आहे, असे सांगून डॉ. सिंग म्हणाले की, पत्रकारितेची मूल्ये रुजवण्यासाठी लोकमतने सदैव पुढाकार घेतला आहे. दिल्लीत पदार्पण केल्याने लोकमतची जबाबदारी अजूनही वाढली आहे.