नवी दिल्ली - प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय यांनी गुरुवारी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. या देशाला सध्या 4 लोक चालवत आहेत, त्यापैकी दोन खरेदी करतात, तर दोघे जण विकत आहेत, असे म्हणत राय यांनी सरकारवर टीका केली. पंजाब युनिव्हर्सिटीच्या सनी ओबेरॉय ऑडिटोरियममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राय त्यांनी देशातील प्रमुख मीडियासह काही संस्थांचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचंही म्हटलं.
लेखिका अरुंधती राय यांनी पुढे बोलताना म्हटले की, सध्या देशात जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, असे म्हणत धार्मिक संस्था आणि संघटनांनाही त्यांनी लक्ष्य केलं. तसेच, शेतकरी आंदोलनाचे कौतूक करत, या आंदोलनाने जगाला दाखवून दिले की आपल्या न्याय हक्कासाठी आपण कशारितीने सरकारच्या डोळ्यात डोळे घालून संवाद करू शकतो. दरम्यान, सध्या देश 4 लोकं चालवत असल्याचे म्हणत अरुंधती राय यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देशातील दोन नामवंत उद्योजकांना लक्ष्य केलं. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडेच त्यांच्या म्हणण्याच्या रोख होता, असे दिसून आले.
दरम्यान, अरुंधती राय यांच्या युनिव्हर्सिटीतील कार्यक्रमाला येण्याचा विद्यार्थीनींच्या एका गटाने विरोध केला. पूर्व भागात या लेखिकांनी केलेल्या विधानाचा निषेध करत या विद्यार्थीनींनी घोषणाबाजीही केली.