नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवासी रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये जैव-शाैचालयांचा (बायाे टाॅयलेट्स) वापर सुरू केला. याचा सखाेल अभ्यास करण्यात आला असून त्याचा व्यवस्थापन अभ्यासक्रमात समावेश करण्यास रेल्वेने मंजुरी दिली आहे. ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस’ने (आयएसबी) जैव-शाैचालयांवर अभ्यास केला हाेता. त्यास रेल्वेने अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास मंजुरी दिली आहे. अभ्यासादरम्यान घेण्यात आलेली छायाचित्रेही वापरण्याबाबत परवागी देण्यात आली आहे. या केस स्टडीचा इतर शैक्षणिक संस्थादेखील अभ्यासक्रमात वापर करू शकतात, असेही रेल्वेने दिलेल्या परवानगी पत्रात म्हटले आहे.
रेल्वेने डीआरडीओच्या सहकार्याने जैव-शाैचालयांचे तंत्रज्ञान विकसित केले हाेते. भारतीय रेल्वेचे देशभरात खूप माेठे जाळे आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान रेल्वे डब्यांमध्ये वापरणे माेठ्या जिकिरीचे काम हाेते. जैव-शाैचालये पर्यावरण पूरक आहेत. रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी याची खूप मदत हाेते. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे, रेल्वे रुळ गंजण्याचे प्रमाण यामुळे कमी झाले आहे. परिणामी रेल्वेची माेठी बचतही झाली आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. डब्यांमध्ये दुर्गंधीबाबत तक्रारी वाढत हाेत्या. त्यावरही रेल्वेने मार्ग काढला. नवीन एलएचबी वातानुकूलित डब्यांमध्ये विमानांमध्ये वापरतात त्याप्रमाणे बायाे व्हॅक्यूम शाैचालये लावण्यात येणार आहेत. लाॅकडाऊनच्या काळात आतापर्यंत ८०० डब्यांमध्ये हे काम पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. संपूर्ण कामासाठी १५०० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.