मुंबई: डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटोनं सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनीही ट्विट करत आपल्याला आयडिया ऑफ इंडियाचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं. आम्ही व्यवसाय करताना मूल्यं पाळतो, अशी भावना त्यांनी ट्विटमधून व्यक्त केली. यामुळे सध्या ट्विटरवर गोयल आणि झोमॅटोचं कौतुक होत आहे. अमित शुक्ला नावाच्या एका व्यक्तीनं ट्विट करत आपण झोमॅटोवरुन केलेली ऑर्डर रद्द केल्याचं म्हटलं. 'त्यांनी (झोमॅटोनं) माझ्या ऑर्डरची जबाबदारी हिंदू नसलेल्या रायडरकडे दिली. रायडर बदलणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी ऑर्डर रद्द केल्यास भरलेले पैसे परत मिळणार नाहीत, असं ते म्हणाले. हाच डिलीव्हरी बॉय तुमच्याकडे जेवण घेऊन येईल, अशी सक्ती तुम्ही मला करू शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. तुम्ही पैसे परत करू नका. पण ऑर्डर रद्द करा,' असं ट्विट शुक्ला यांनी केलं.
डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं जेवण नाकारलं; झोमॅटोचं ग्राहकाला सणसणीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 3:00 PM