Ola showroom Fire video : खरेदी केलेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वैतागलेल्या ग्राहकाने ओला शोरुमलाच आग लावली. कर्नाटकातील कलबुर्गी शहरात ही घटना घडली आहे. आगीत शोरुममधील गाड्यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ग्राहकाला अटक केली आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, २६ वर्षीय मोहम्मद नदीम याने ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. २८ ऑगस्ट रोजी स्कूटर खरेदी केली. त्यानंतर सातत्याने स्कूटरमध्ये बिघाड होत होता.
दुरुस्ती नीट करत नसल्याने वैतागला अन्...
मोहम्मद नदीमने स्कूटर वारंवार बिघडत असल्याचे आणि प्रॉब्लेम असल्याचे शोरुममधील कर्मचाऱ्याला सांगितले. स्कूटर बिघडल्यानंतर नदीम शोरुमला घेऊन जात होता. दुरूस्त केल्यानंतर स्कूटर पुन्हा बिघडत होती. वारंवार सांगूनही ओला कर्मचाऱ्यांकडून स्कूटर व्यवस्थित रिपेअर केली जात नसल्याने नदीम यांची चिडचिड वाढली.
१.४ लाखांना घेतली स्कूटर, काही दिवसांतच बिघाड
नदीमने १ लाख ४ हजार रुपयात ओला स्कूटर घेतली होती. खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच बॅटरी आणि साऊंड सिस्टीममध्ये बिघाड झाली. त्यामुळे नदीम वारंवार शोरुमला जात होते. दुरूस्त केल्यानंतर पुन्हा बिघाड होत असल्याने ते चिडले.
१० सप्टेंबर रोजी ते पेट्रोल घेऊन ओला शोरुममध्ये आले. शोरुम बंद असतानाच त्यांनी बाहेर पेट्रोल फेकले आणि आग लावली. कुणी नसल्याने यात जीवित हानी झाली नाही. मात्र, शोरुममधील गाड्या आणि इतर सामान जळाले.
सुरूवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय पोलिसांना होता. पण, त्यांनी नदीमला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने आग लावल्याची कबूली दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.