नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) पहिल्यांदा अबकारी विभाग, प्राप्तिकर विभाग, वाणिज्य व लेखा विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने बुधवारी सहाजणांची सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक पदावर प्रतिनियुक्ती केली आहे. यात चार अधिकार कस्टम, इन्कम टॅक्स व लेखा सेवेतील अधिकारी आहेत.
सीबीआयमध्ये आयआरएस सेवेतील अधिकाऱ्यांना अधीक्षक पदावर नियुक्ती करण्याची पहिलीच वेळ आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने आदेश निर्गमित केले आहे. यात दोन आयपीएस अधिकाऱ्यांसह या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अमनजीत कौर (आयपीएस २००९ तुकडी) व सायली धुरट (आयपीएस २०१० तुकडी) यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय इंडियन ट्रेड सर्व्हिसेस (आयटीएस)मधील २०११ च्या तुकडीतील मनोरंजन, भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस (आयटी) २०११ तुकडी) अमित संजय कदम, भारतीय महसूल सेवेतील (कस्टम व इन्डायरेक्ट टैक्स) शुभेंद्र कट्टा, व इंडियन डिफेन्स अकाऊंट सेवेतील स्वप्निल अग्रवाल यांची सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती केली आहे.