लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शत्रूच्या काळजात धडकी भरवणारी व भारताच्या हवाई सीमांची सुरक्षाव्यवस्था आणखी बळकट करणारी पाच राफेल विमाने भारतात अंबाला हवाई तळावर बुधवारी दाखल झाली. यावेळी शानदार ‘वॉटर कॅनन सॅल्यूट’ने या विमानांचे जोरदार स्वागत करण्यात आले.फ्रान्सच्या बोरदू शहरातील मेरिगनेक हवाई तळावरून ७००० किलोमीटरचे अंतर पार करून ही विमाने भारतीय हवाई हद्दीत आली तेव्हा दोन सुखोई ३० एमकेआय विमानांनी त्यांचे स्वागत केले व अंबालापर्यंत आणले.
जगभरातील सर्वोत्तम लढाऊ विमानांमध्ये समावेश असलेल्या राफेलचा ५९,००० कोटी रुपयांचा सौदा एनडीए सरकारने २३ सप्टेंबर २०१६ रोजी केला होता. एकूण ३६ विमाने भारत खरेदी करणार आहे. आज आलेल्या ५ विमानंपैकी तीन विमाने एक आसनी तर दोन विमाने दोन आसनी आहेत. त्यांना अंबालास्थित स्क्वाड्रन१७मध्ये समाविष्ट केले जाईल. भारताला आतापर्यंत एकूण १० विमाने पुरवण्यात आली असून, त्यापैकी पाच विमाने प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येच ठेवलेली आहेत. खरेदी केलेली राफेलची सर्व ३६ विमाने २०२१पर्यंत भारतात येणार आहेत. पाच विमाने भारतात येत असतानाच ३०,००० फूट उंचीवर त्यांनी इंधने भरली आहेत.मोदी म्हणाले, स्वागतम्!राफेल विमाने भारतात येताच मोदींनी स्वागतम असे म्हटले आहे. संस्कृतमधील टष्ट्वीटमध्ये ते म्हणतात की - राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम, राष्ट्ररक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च। नभ: स्पृशं दीप्तम...स्वागतम। याचा अर्थ असा आहे की, देशाच्या संरक्षणासारखे कोणतेही पुण्य नाही, देशाच्या संरक्षणासारखे कोणतेही व्रत नाही. देशाच्या संरक्षणासारखा कोणताही यज्ञ नाही.अभूतपूर्व शक्ती-संरक्षणमंत्रीराफेलचे भारतात स्वागत होताच ‘बर्डस’सुरक्षित उतरले आहेत, असे टष्ट्वीट संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले आहे. हवाई दलात लढाऊ विमानांना ‘बर्डस’ म्हणतात. भारताच्या सैन्य इतिहासातील नव्या अध्यायाची ही सुरूवात आहे. ही बहुउद्देशीय विमाने भारतीय हवाई दलाला अभूतपूर्व शक्ती प्रदान करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.अरबी समुद्रावर ही विमाने दाखल होताच तेथे तैनात असलेल्या आयएनएस कोलकाताने या विमानांचे स्वागत केले. त्यानंतर ही विमाने हरयाणातील अंबालाकडे वळली.