डाव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कट? दिल्लीतील प्राध्यापकाच्या आरोपाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 06:42 AM2021-10-10T06:42:46+5:302021-10-10T06:43:22+5:30
Education, politics News: प्राध्यापक राकेश पांडे हे गेल्या तीस वर्षांपासून किरोडीमल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषय शिकवीत आहेत. केरळी विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी काढलेल्या उद्गारांना काही विद्यार्थी, प्राध्यापकांनी समर्थन दिले, तर काही जणांनी विरोध केला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठामध्ये डाव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी एक सुनियोजित कट आखण्यात आला आहे. त्यानुसार केरळशिक्षण मंडळ आपल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण देते. मग हे विद्यार्थी दिल्ली विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालयांत प्रवेश घेऊन डाव्या विचारांचा प्रसार करतात, असा आरोप दिल्लीतील किरोडीमल कॉलेजचे प्राध्यापक राकेश पांडे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
प्राध्यापक राकेश पांडे हे गेल्या तीस वर्षांपासून किरोडीमल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषय शिकवीत आहेत. केरळी विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी काढलेल्या उद्गारांना काही विद्यार्थी, प्राध्यापकांनी समर्थन दिले, तर काही जणांनी विरोध केला आहे. राकेश पांडे म्हणाले की, डाव्या विचारांच्या लोकांचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता दिल्ली विद्यापीठाकडे मोर्चा वळविला. डावी विचारसरणी दुसऱ्यावर लादण्यासाठी केरळमधील शिक्षण मंडळामार्फत एक कट आखण्यात आला. त्याद्वारे केरळमधील विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण देऊन त्यांना दिल्लीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून दिला जात आहे. तिथे डाव्या विचारांचा केरळी विद्यार्थी प्रचार करतात असे आढळून आले आहे. राकेश पांडे यांनी मांडलेल्या मतांना विरोध करताना अरबिंदो कॉलेजचे प्राध्यापक आदित्य नारायण मिश्रा यांनी सांगितले की, दिल्ली विद्यापीठ एक केंद्रीय विद्यापीठ आहे. तिथे देशातील कोणत्याही भागातले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळतात, त्यांना प्रवेश कसा काय नाकारणार, राकेश पांडे यांनी केलेल्या विधानांमुळे दिल्ली विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे.
एएसयूआयचा विरोध, अभाविपचा पाठिंबा
- काँग्रेसची विद्यार्थी संघटना एसएसयूआयने राकेश पांडे यांच्याविरोधात निदर्शने केली, तर अभाविपने पांडे यांना समर्थन दिले आहे.
- दिल्ली विद्यापीठाच्या पहिल्या कट ऑफ लिस्टमध्ये सर्वांत जास्त प्रवेश सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळाला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केरळ बोर्डाचे विद्यार्थी आहेत.
- सीबीएसई बोर्डाचे ३११७२, केरळ शिक्षण मंडळाचे २३६५, हरियाणा शिक्षण मंडळाचे १५४०, राजस्थान बोर्डाच्या १३०१ विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे.