नवी दिल्ली : भाव कमी झाल्याने सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य प्रति टन ४०० डॉलर केले आहे. या आधी निर्यात मूल्य प्रति टन ७०० डॉलर होते. निर्यात मूल्यापेक्षा कमी भावाने व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करण्याची मुभा नसते. निर्यातीवर निर्बंध घालण्यासाठी तसेच देशांतर्गत कांद्याच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी निर्यात मूल्य वाढविण्यात येते.कांद्याची आवक आणि भावाबाबत आंतरमंत्रालयीन गट दर दोन आठवड्यांनी फेरआढावा घेईल, असे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला कृषिमंत्री राधा मोहन सिंह आणि सीतारमन यांची उपस्थिती होती. नियमितपणे कांद्याची उपलब्धता आणि भावाबाबत आकलन केले जाईल, असेही निर्मला सीतारमन यांनी सांगितले. कांद्याचा भाव आकाशाला भिडल्याने आॅगस्टमध्ये सरकारने निर्यात मूल्य ४२५ डॉलरवरून प्रति टन ७०० डॉलर केले होते. कांद्याचा भाव प्रति किलो दहा रुपयांवर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी किमान निर्यात मूल्य रद्द करण्याबाबत केंद्राला साकडे घातले होते. कांद्याची आशियातील मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात घाऊक भाव प्रति किलो १० ते १४ रुपयांदरम्यान आहे. आॅगस्टमध्ये हाच भाव प्रति किलो ५७ रुपये होता.
कांद्याच्या निर्यात मूल्यात प्रति टन ३०० डॉलरची कपात
By admin | Published: December 11, 2015 2:20 AM