लखनौ : योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्यांच्या संरक्षणात कपात केली आहे तर काही नेत्यांच्या संरक्षणाचा दर्जा खाली आणला आहे. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आणि मायावती, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव आणि रामगोपाल यादव आणि सपाचे नेते शिवपाल यादव व आझम खान यांचा संरक्षणात कपात झालेल्यांमध्ये समावेश आहे.भाजपचे नेते विनय कटियार यांच्यासह काही जणांच्या संरक्षणात वाढ झाली आहे. कटियार यांना आता झेड दर्जाचे संरक्षण मिळेल.हा निर्णय शनिवारी रात्री उशिरा प्रधान सचिवांचा (गृह) समावेश असलेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी रात्रापासूनच आदेशाची अमलबजावणी सुरू झाली.१५१ अतिमहत्वाच्या व्यक्तींना दर्जा असलेले संरक्षण दिले गेलेले आहे. त्यातील १०५ जणांचे संरक्षण पूर्णपणे काढून घेण्यात आलेले असून ४६ जणांच्या संरक्षणाच्या दर्जात कपात करण्यात आली आहे. संरक्षण पूर्णपणे काढून घेण्यात आलेल्या प्रमुख नेत्यांत बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्र यांचा समावेश आहे.
अखिलेशसह अनेकांच्या सुरक्षा दर्जात कपात
By admin | Published: April 24, 2017 12:45 AM