नवी दिल्ली : बँक आॅफ बडोदातून हाँगकाँगला पाठविण्यात आलेल्या १,६०० कोटी रुपयांच्या प्रकरणी केंद्रीय दक्षता आयोगाने सीबीआय आणि बडोदा बँकेकडून अहवाल मागविला आहे.या प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत असून, सीबीआयच्या तपासावर दक्षता आयोगाची निगराणी आहे. काळ्या पैशाबाबत होणारे व्यवहार रोखण्यासाठी बँकांच्या कामकाजात ‘योग्य ते बदल’ करण्याची योजनाही दक्षता आयोग आखत आहे. याबाबत केंद्रीय दक्षता आयुक्त के.व्ही. चौधरी म्हणाले की, ‘बँकेच्या अधिकाऱ्यांची भूमिकासुद्धा तपासली जाणार आहे. यात बँकेच्या अधिकाऱ्यांसह केंद्र सरकारमधील कोणता अधिकारी गुंतला आहे का, याचीही निश्चित चौकशी केली जाईल. अशा प्रकारचा घोटाळा होण्याची शक्यता असेल, तर त्याचा पूर्व इशारा देणारी यंत्रणा विकसित करता येईल का, याचाही आम्ही अभ्यास करीत आहेत.’ या घोटाळ्यामागे बँकेतील व्यवस्थेची समस्या दिसत नाही, असे विधान अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केले. या पार्श्वभूमीवर चौधरी यांचे हे विधान आले आहे. दिल्लीतील अशोकविहारस्थित शाखेतून हाँगकाँगला १,६०० कोटी रुपये गैरमार्गाने धाडण्यात आले.
सीव्हीसीला हवा बडोदा बँक घोटाळ्याचा अहवाल
By admin | Published: October 23, 2015 2:52 AM