"काँग्रेसनं आजवर तुम्हाला खूप दिलं, आता पक्षाचा विचार करा", सोनिया गांधी कार्यकारिणी बैठकीत स्पष्टच बोलल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 09:05 AM2022-05-10T09:05:44+5:302022-05-10T09:06:27+5:30
राजकारणात वाईट दिवस सुरू असलेला काँग्रेस पक्ष आता अॅक्शन मोडमध्ये आला आहे. काँग्रेसचं तीन दिवसीय चिंतन शिबीर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली-
राजकारणात वाईट दिवस सुरू असलेला काँग्रेस पक्ष आता अॅक्शन मोडमध्ये आला आहे. काँग्रेसचं तीन दिवसीय चिंतन शिबीर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची (CWC) बैठक पार पडली. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते.
सोनिया गांधी यांनी यावेळी उदयपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या चिंतन शिबीरात जवळपास ४०० सहकारी सहभागी होणार असल्याचं सांगितलं. यातील बहुतांश नेते पक्षात विविध महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. या शिबीराआधी सोनिया गांधी यांनी नेत्यांना संबोधित करताना काँग्रेस पक्षानं आजवर तुम्हाला खूप काही दिलं आहे. आता पक्षाच्या कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली आहे, असं स्पष्टच सांगितलं.
"आपल्या सर्वांसाठी आता काँग्रेस पक्षानं केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी आजवर महत्वाची पदं उपभोगली आहेत. आता तुम्ही पक्षाचा विचार केला पाहिजे. अर्थातच पक्षातील त्रृटींवर भाष्य करणं आणि टीका करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण स्वपक्षावर केलेल्या टीकेमुळे पक्षातील इतर नेत्यांचा आत्मविश्वासाला तडा जाईल आणि नकारात्मक वातावरण तर तयार होत नाही ना? याचा विचार करायला हवा", असं सोनिया गांधी म्हणाल्या.
चिंतन शिबीरात पक्षातील समन्वय आणि संतुलन राखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. यात एकूण सहा समूहांमध्ये चर्चा केली जाईल, असंही सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितलं. राजकारण आणि संघटनात्मक गोष्टींसोबतच आर्थिक, सामाजिक न्याय, शेतकरी, युवा या मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
भाजपाचा विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह नाही
चिंतन शिबिरात CWC चे सदस्य, विशेष आमंत्रित सदस्य, प्रदेशाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री, सर्व खासदार, CLP नेते, विविध विभागाचे चेअरमन, महिला काँग्रेस, युथ काँग्रेस आणि एनएसयूआयचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर टीका करणं राष्ट्रद्रोह ठरू शकत नाही, असं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले. मोदी सरकारनं जनतेचा आवाज दाबण्याचं काम केलं आहे तसंच राजद्रोहाच्या कायद्याचा दुरुपयोग केला असल्याचंही ते म्हणाले.