डेहराडून: आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या करुन लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि हजारो-लाखो रुपये लुटतात. अशाच प्रकारची एक घटना एका आयटी कर्मचाऱ्यासोब घडली आहे. ऑनलाइन एस्कॉर्ट सेवेच्या प्रकरणात त्याला लाखो रुपये गमवावे लागले. सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला पोलीस असल्याचे दाखवून त्याला ब्लॅकमेल केले आणि त्याच्याकडून चार लाख रुपये लुटले.
ऑनलाईन लिंकवर दिली स्वतःची माहितीआयटी कर्मचारी सायबर फ्रॉडला बळी पडल्याची घटना डेहराडूनमधून समोर आली आहे. येथील जुन्या नेहरू कॉलनीत राहणाऱ्या अभिषेक गुप्ता यांनी 7 फेब्रुवारी रोजी इंटरनेटवरील एका वेबसाइटला भेट दिली. तिथे मिळालेल्या एस्कॉर्ट सर्व्हिसच्या लिंकवर जाऊन अभिषेक एकामागून एक माहिती देत राहिला. आधी सेवेचे पैसे भरण्यास सांगितले, त्यावर अभिषेकने 550 रुपये ऑनलाइन पेमेंट केले. यानंतर काही तरुणींचे फोटो पाठवून त्याला एक ठरवण्यास सांगितले. त्याने त्या साईटवर आपली बरीच माहिती दिली.
हॉटेलला फोन केला पण...संभाषणानंतर अभिषेकला ईसी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. त्या ठिकाणी पोहोचल्यावर अभिषेकला तिथे कोणीही आढळून आले नाही. यानंतर त्याला फोन करून आणखी काही रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. ही रक्कमही अभिषेकने दिली, त्यानंतरही सेवा न मिळाल्याने तो घरी गेला. यानंतर 9 मार्च रोजी त्याला व्हॉट्सअॅप कॉल आला. पोलीस असल्याचे सांगून धमकावलेकॉल करुन आरोपींनी अभिषेकला पोलीस असल्याचे सांगून धमकावले. जयपूरमध्ये त्याच्यावर मुलगी विकत घेतल्याचा गुन्हा दाखल होणार असल्याची भीती त्याला दाखवली. तसेच, प्रकरण शांत करण्याच्या नावाखाली आरोपींनी त्याच्याकडे 90 हजार रुपयांची मागणी केली. अभिषेकने ही रक्कम आरोपींच्या खात्यावरही पाठवली. आरोपींनी पुन्हा फोन करुन सायबर सेलचे अधिकारी असल्याची बतावणी केली आणि अभिषेकला 4 लाख रुपयांची मागणी केली. अभिषेकने हे पैसे दिले, पण नंतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्याने नेहरू कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक प्रदीप चौहान यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.