तिरुवनंतपूरम - भारतात कारवाया करण्यासाठी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्यात पटाईट असलेल्या पाकिस्तानने आता सायबर हल्ले करण्याचा मार्ग अवलंबला आहे. पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी आता व्हॉट्स्अॅप आणि लिंकच्या माध्यमातून भारतीय तरुणांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय नागरिकांचा पर्सनल डेटा चोरण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात येत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार +92 या आकड्याने सुरू होणाऱ्या पाकिस्तानी क्रमांकावरून फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. केरळमध्ये विशेषकरून मल्याळम भाषा बोलणाऱ्या युझर्सना अशा प्रकारचे फेक मेसेज मिळत आहेत. तसेच अनेक वेबसाइट्सवर शेकडोंच्या संख्येने लिंक पडल्या आहेत. कुठलाही युझर्स जेव्हा या लिंकवर क्लिक करतो तेव्हा तो आपोआप कुठल्यातर व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडला जातो. या व्हॉट्सअॅप ग्रुपची नावे इंटरकनेक्टेड, आय लव्ह माय पाकिस्तान, पाकिस्तान झिंदाबाद अशी आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे सुमारे 60 ते 70 ग्रुप आहे. या ग्रुपचे अॅडमिन पाकिस्तानमधील इस्लामाबाद, मुल्तान आदी शहरांमधून सूत्रे हलवत आहेत. या हॅकर्सकडून केरळमधील लोकांना विशेषकरून तरुणांना टार्गेट केले जात आहे. केरळमधील आयटी एक्सपर्ट्सनी यासंदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे.
सायबर वॉर : व्हॉट्सअॅप आणि फेक लिंकमधून तरुणांना टार्गेट करतोय पाकिस्तान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 3:51 PM