येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. त्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. देशातील सर्वसामान्यांमध्येही उत्सवानिमित्त वेगळाच उत्साह आहे. परंतु सायबर गुन्हेगार तुमच्या उत्साहाचा बेरंग करू शकतात. श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अनेक सायबर ठग सक्रिय झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
सायबर गुन्हेगार तुम्हाला राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या नावाने मेसेज पाठवू शकतात. या मेसेजमध्ये एक लिंक देखील असू शकते, ज्यावर दावा केला जाईल की त्यावर क्लिक करून तुम्ही राम लल्ला सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या सायबर शाखेने अलर्ट जारी केला आहे. सायबर शाखेने असे अनेक बनावट लिंक शोधून काढले आहेत. यामध्ये सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत.
रामभक्तांनी सायबर गुन्हेगारांच्या या संदेशाच्या लिंकवर क्लिक करताच यानंतर, ही लिंक त्यांच्या मोबाईलमधील अतिसंवेदनशील डेटा चोरी करेल अथवा बँक खाते अॅप किंवा वॉलेट अॅप हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास करू शकते. जर तुम्हाला असा मेसेज आला तर तुम्ही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. यूजर्स कोणत्याही लिंकवर क्लिक न करता ती डीलिट करू शकतात. जर एखादा तुमच्या ओळखीतला व्यक्ती असा संदेश पाठवत असेल तर आपण त्याला या मेसेजची सत्यता सांगू शकता. अशा लिंक्स कोणाला आढळल्यास किंवा कोणतीही फसवणूक झाल्यास त्यांनी सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी.
उत्तर प्रदेश सरकारनंही दिला अलर्ट
राम मंदिर सोहळ्याचे आणि प्राणप्रतिष्ठा विधीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याच प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याचा धोका आहे. त्यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारकडून इशाराही देण्यात आला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांनी सर्व विभाग प्रमुखांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सरकारी वेबसाइट्स आणि पोर्टल्सच्या सायबर सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य सचिवांनी अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना सायबर सुरक्षा कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.