नवी दिल्ली: भारताच्या किनारपट्टीला लवकरच 'अम्फान सुपर सायक्लोन' हे चक्रीवादळ धडकणार असून, हे वादळ विक्राळ रूप धारण करणार असल्याची माहिती हवामान खात्यानं सोमवारी दिली होती. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले महाचक्रीवादळ (सुपर सायक्लोन) काही तासांनी भारताच्या समुद्र किनारपट्टीला धडकणार आहे. तसेच गेल्या काही तासांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
अम्फान सुपर सायक्लोनच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलालाही अलर्ट करण्यात आलं आहे. तर आतापर्यंत ३ लाख नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
अम्फान सुपर सायक्लोन हे बुधवारी कधीही किनारपट्टीला धडकू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे एनडीआरएफसह विविध विभाग परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत. एनडीआरएफच्या १५ टीमनी ओडिशामध्ये काम सुरू केले आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये देखील १९ टीम कामाला लागल्या आहेत.
बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पश्चिम-मध्य भागांत ताशी १३ किलोमीटर वेगाने प्रवास करणारे 'अम्फान सुपर सायक्लोन' १२ तासांत वेग वाढवेल आणि शक्तिशाली रूप घेईल. जोरदार वाऱ्यामुळे कच्च्या घरांचे बरेच नुकसान होणार असून, 'पक्के' घरांचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.