पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले महाचक्रीवादळ अम्पन' आता अतिशय धोकादायक झाले असून उद्या बुधवारी ते पश्चिम बंगालमधील दिघा ते बांगला देशातील हटिया दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.यामुळे किनारपट्टीवरील राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे महाचक्रीवादळ मंगळवारी दुपारी पश्चिम बंगालमधील दिघापासून ५१० किमी, ओडिशातील दक्षिण पॅरादीपपासून ३६० किमी आणि बांगला देशातील खेपुपारा येथून ६५० किमी दूर होते.गेल्या ६ तासापासून ते ताशी १८ किमी वेगाने किनार्याकडे येत आहे़. हे महाचक्रीवादळ दिघा ते हटिया दरम्यान २० मेरोजी सायंकाळी धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी या महाचक्रीवादळाचा वेग ताशी १५५ ते १६५ किमी असण्याची शक्यता आहे. या महाचक्रीवादळामुळे ओडिशातील बहुतांश जिल्ह्यात १९ व २० मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.या महाचक्रीवादळामुळे समुद्रात ५ मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्ची घरे, वीजेचे खांब, रेल्वे मार्ग, रस्ते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राज्यात गेल्या २४ तासात मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुढील तीन दिवस गोव्यासह राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. २० ते २३ मेदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.