गुजरातनंतर बिपरजॉय चक्रीवादळाचा सर्वात वाईट परिणाम राजस्थानवर दिसून येत आहे. येथील अनेक भागात सतत पाऊस पडत आहे. येथील मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सलग 36 तास सुरू असलेल्या पावसामुळे जालोरची परिस्थिती बिकट झाली आहे. याशिवाय सिरोही आणि बारमेरमध्येही पूरस्थिती आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे अजमेर ते पालीपर्यंतचा परिसर पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, पावसापासून दिलासा न मिळण्याची शक्यता हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केली आहे.
सध्या मदत आणि बचाव कार्य दल अतिसंवेदनशील भागातून लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेत आहे. परिसरातील दुकानांमध्ये 5 ते 6 फुटांपर्यंत पाणी भरले होते. दुसरीकडे, अजमेरच्या रुग्णालयांमध्ये पाणी भरले आहे. पाली, जोधपूर, सिरोहीमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. राजस्थानचे आपत्ती आणि मदत सचिव पीसी किशन यांनी सांगितले की, "बाडमेर, जालोर आणि सिरोहीसह राज्यातील अनेक भागांत येत्या 15-20 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आमची टीम अलर्टवर आहे."
59 जणांची सुटका
"पिंडवाडा, अबू रोड आणि रेवारची अनेक धरणे आता भरली आहेत. नद्या, नाले तुंबले आहेत. सिरोहीच्या बतीसा धरणाची पाणीपातळी 315 मीटर असून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे." हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पालीच्या ऐरण पुरा रोडमध्ये 226 मिमी, सिरोहीमध्ये 155 मिमी, जालोरमध्ये 123 मिमी आणि जोधपूर शहरात 91 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्य आपत्ती निवारण दलाचे (एसडीआरएफ) कमांडंट राजकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालोरच्या भीनमाल शहरातील पूरग्रस्त ओडमध्ये अडकलेल्या 39 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. त्याच वेळी, बाडमेर जिल्ह्यातील धौरीमन्ना शहरातील सखल भागात पाणी साचल्याने घरांमध्ये अडकलेल्या 20 लोकांनाही वाचवण्यात आले आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू
बाडमेर आणि राजसमंद जिल्ह्यात पावसाशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह चार जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. बाडमेरच्या सेवादा पोलीस ठाण्याचे प्रमुख हंसाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गंगासारा गावात तलावात बुडून दोन अल्पवयीन भावांचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुसरीकडे, राजसमंद पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजसमंदच्या बाघोटा गावात लँड स्लाईडिंगमुळे प्रेमसिंग राजपूत (45) यांचा मृत्यू झाला तर केळवा पोलीस स्टेशन हद्दीतील लालीबाई (48) यांचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला.
गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस
जयपूर हवामान केंद्राचे प्रभारी राधेश्याम शर्मा यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत जालोर, सिरोही, बारमेर आणि पाली जिल्ह्यांमध्ये आणि राज्यातील इतर अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ते म्हणाले की, पाली, राजसमंद, अजमेर आणि उदयपूर जिल्ह्यात आणि लगतच्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. शर्मा यांनी सांगितले की, पुढील 24 तासांत अजमेर आणि उदयपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.