नवी दिल्ली: बिपरजॉय वादळाने कालपासून पुन्हा जोर पकडला आहे, पाकिस्तानच्या दिशेने जात असलेले हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने जात आहे. १५ जून रोजी कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीदरम्यान 'बिपरजॉय' या तीव्र चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या टीम्स किनारी भागात तैनात करत आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये निवारा केंद्रे उभारणार आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. एअर इंडिया, स्पाईसजेटकडून बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवस विमान सेवेवर परिणाम होणार असल्याची माहिती आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे एअर इंडियाची काही उड्डाण सेवा रद्द करण्यात आली आहेत, तर काही उड्डाण सेवा विलंबाने असल्याची माहिती माहिती आहे. तसेच आगमी दोन दिवसांत काही उड्डाणे रद्द होण्याची देखील शक्यता आहे.
दरम्यान, चक्रीवादळामुळे १४ जून आणि १५ जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.