'बिपरजॉय' चक्रीवादळ आता तीव्र होणार आहे. येत्या ६ तासांत अत्यंत तीव्र चक्री वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आता भारतीय हवामान विभागाने अपडेट दिली आहे. 'वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता नाही, पण त्याच्या प्रभावाखाली पुढील ५ दिवसांत राज्यात जोरदार वारे वाहून पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेली माहिती अशी, चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेला परत येण्यापूर्वी पुढील तीन दिवसांत उत्तर-ईशान्य दिशेने सरकेल. चक्रीवादळ सध्या पोरबंदरपासून ६०० किमी अंतरावर आहे. सध्या चक्रीवादळ पोरबंदरपासून २००-३०० किमी आणि नलिया कच्छपासून २०० किमी अंतरावर जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार, वादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता नाही.
मच्छिमारांना पुढील ५ दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मासेमारीची सर्व कामे स्थगित करण्यात आली आहेत. “चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत आहे. पुढील २४ तासांत त्याचा वेग ईशान्येकडे बदलण्याची शक्यता आहे. त्यानंतर चक्रीवादळाची वाटचाल उत्तर-वायव्य दिशेने होईल. गुजरातमध्ये पुढील ५ दिवसांत विखुरलेल्या गडगडाटाची शक्यता आहे, सौराष्ट्र-कच्छ भागात वाऱ्याचा वेग जास्त असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील दोन दिवसांत सौराष्ट्र-कच्छ भागात ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यानंतर, प्रदेशात वाऱ्याचा वेग ३०-५० किमी प्रतितास ते ५० किमी प्रतितास या वेगाने वाहण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी पोरबंदर, गीर सोमनाथ आणि वलसाड जिल्ह्यात एनडीआरएफची टीम पाठवली आहे. भारतीय तटरक्षक दलाने मासेमारी समुदाय आणि गुजरात, दमण आणि दीव येथील खलाशांना आवश्यक खबरदारी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.