Biparjoy Cyclone Updates : सर्वांना धडकी भरवणारं बिपरजॉय चक्रीवादळ आज संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचे सांगितले जात होते. पण अरबी समुद्रात तयार झालेले हे चक्रीवादळगुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्रकडे कूच करत असून रात्रीपर्यंत जाखाऊ बंदराजवळील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. लक्षणीय बाब म्हणजे किनारपट्टीवर आदळण्यापूर्वी ते किंचित स्वरूपात मवाळ झालेले असेल, परंतु तरीही त्यात हानी पोहचवण्याची क्षमता आहे.
गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात बुधवारी जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि ताशी १२५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, हा वेग १४५ किमी प्रतिताशीपर्यंत पोहोचू शकतो. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये दोन ते तीन मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच सखल भागात पाणी भरू शकते. कच्छ, सौराष्ट्र हा परिसर ओलांडल्यानंतर या वादळाचा प्रभाव १६ जून रोजी दक्षिण राजस्थानवर दिसणार आहे. १७ जूननंतर परिस्थिती सुधारू शकते. ६-७ जून रोजी आग्नेय अरबी समुद्रावर बिपरजॉय तयार झाले. यानंतर ११ जून रोजी त्याचे तीव्र वादळात रूपांतर झाले.
कराचीकडे वळण्याची शक्यताअरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ रात्री ९.३० च्या सुमारास गुजरातच्या जाखाऊ बंदरावर धडकू शकते. आत्तापर्यंत ते दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत किनारपट्टीवर धडकेल असा विश्वास होता. अशातच त्याच्या मार्गात थोडासा बदल झाल्याचे समोर येत आहे. कारण त्याचा मार्ग आता पाकिस्तानातील कराचीकडे वळत आहे. चक्रीवादळ कराची आणि मांडवी किनारपट्टी ओलांडेल तेव्हा वाऱ्याचा वेग ११५-१२५ किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडी दिल्लीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.