कोलकाता - 'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. किनारपट्टी भागातील लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. बुलबुल या चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये तब्बल 19,000 कोटींचं नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस झाला आहे. तसेच जनजीवन विस्कळात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. चक्रीवादळचा फटका बसलेल्या भागांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार विविध भागांचे रिपोर्ट तयार करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये बुलबुल चक्रीवादळामुळे 15,000 कोटी ते 19,000 कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सिंचन, वन, वीज, सार्वजनिक आरोग्य, इंजिनिअरिंगल आणि पंचायतीसह विविध विभागांना याबाबतचा रिपोर्ट सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम रिपोर्ट तयार केला जाईल आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक भागातील रस्ते आणि वीज पुरवठा बंद झाला आहे. प्रशासनाने रस्त्यांवरील झाडे हटविण्यास सुरुवात केली आहे. वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून मदतकार्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. कोसळलेली झाडे रस्त्यांतून बाजूला सारण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने हाती घेतले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री जावेद खान यांनी 2473 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. 26 हजार घरांची पडझड झाली आहे. राज्यात 9 ठिकाणी लाखो लोकांना शिबिरात ठेवण्यात आले आहे. बुलबुल वादळाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच किनारपट्टी भागातील 1 लाख 20 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले असून काही घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.