ओडिशा - 'महा' चक्रीवादळानंतर आता 'बुलबुल' चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ओडिशाच्या किनारी हे चक्रीवादळ धडकले असून वादळाच्या तडाख्याने किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी शनिवारी (9 नोव्हेंबर) मुसळधार पाऊस पडला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे देखील नुकसान झाले आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. बेघर झालेल्यांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी बालासोरा जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आले आहे.
अमित शहा यांनी स्वतःच्या ट्विटर हॅण्डलवरून पश्चिम बंगालमध्ये १० एनसीआरएफची पथकं आणि ओडिशा येथे ६ पथकं तैनात करण्यात आली असून प्रशासनाला ही पथकं रस्ते रिकामे करून रस्त्यांच्या पुर्नस्थापनेसाठी मदत करणार आहेत. तसेच अतिरिक्त १८ एनडीआरएफची पथकं मदतीसाठी तयार ठेवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. ओडिशातील जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळामुळे झाडे, वीजेचे खांब कोसळले असून त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले तसेच वीजपुरवठा खंडित झाला आहे. या राज्याचे मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून मदतकार्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कोसळलेली झाडे रस्त्यांतून बाजूला करण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व ओडिशा आपत्ती निवारण धडक कृती दलाने हाती घेतले आहे.
बुलबुल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पश्चिम बंगालमध्येही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन स्थितीचा आढावा घेतला व आवश्यकत्या सूचना दिल्या आहेत. बुलबुल वादळामुळे केंद्रपारा जिल्ह्यातील राजनगर भागात शुक्रवारपासून 180 मिमी तर चांदबाली भागात 150 मिमि व जगतसिंगपूर जिल्ह्यातील त्रितोल येथे 100 मिमी पाऊस पडला आहे. किनारपट्टीजवळच्या तीन हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भद्रक जिल्ह्यात कालीभांजा डीहा द्वीपाजवळ एक मच्छिमार बोट बुडाली. मात्र बोटीतील सर्व मच्छिमारांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे. बुलबुल वादळाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच किनारपट्टी भागातील 1 लाख 20 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले असून काही घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.