बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळ निर्माण झालं असून, त्यानं दाना असं नामकरण करण्यात आलं आहे. तसेच दाना चक्रीवादळाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दाना चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून ते दक्षिण भारतापर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच हे चक्रीवादळ २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर आदळू शकतं. या चक्रीवादळामुळे भारत, बांगलादेश आणि म्यानमारला सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे दक्षिण भारतामधील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. दक्षिण भारतात चेन्नईपासून बंगळुरूपर्यंत आणि पाँडेचेरीपासून तिरुवनंतपुरमपर्यंत मुसळदार पाऊस पडत आहे. तसेच पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि ओदिशामध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागच्या २४ तासांमध्ये उत्तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसह दक्षिण भारतातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तसेच पूर्वोत्तर भारत आणि झारखंड व बिहारच्या काही भागातही पाऊस पडला आहे. आता पुढच्या २४ तासांमध्ये उत्तर तामिळनाडू, रायलसीमा, कर्नाटक आणि केरळमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच केरळ, किनारी आंध्र प्रदेश ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंडचा काही भाग, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्य पावसाची शक्यता आहे.