भुवनेश्वरः फनी या चक्रीवादळानं शुक्रवारी ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक इमारतीचा काही भाग कोसळला असून, चारही बाजूंना पाणीच पाणी भरलं आहे. या वादळानं आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 160हून अधिक लोक जखमी आहेत. ओडिशामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हे वादळ पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टीला जाऊन धडकलं आहे. आज सकाळीच फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये पोहोचलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प. बंगालच्या अनेक भागांत या वादळाचा प्रभाव जाणवला. खडगपूर, ईस्ट मिदनापूर, मुर्शिदाबाद, नॉर्थ 24 परगना आणि दिगा सारख्या भागांमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. तसेच 90 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं वारे वाहत आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी निवडणूक रॅली रद्द केल्या आहेत. तसेच सकाळी 8 वाजेपर्यंत कोलकात्यातील विमानतळ सेवा बंद करण्यात आली आहे. या भयावह चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळून पडली आणि घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली आहे. या वादळाने आठ जणांचे बळी घेतले.पुढे वादळाचा वेग कमी झाला व ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याच्या दिशेला सरकले. त्यामुळे तिथेही जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, मनुष्यहानीचे वृत्त नाही. बांगलादेशातील पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या वादळामुळे नेपाळमधील तापमानात बदल झाले असून, तिथेही जोरदार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांच्या संपर्कात केंद्र सरकार असून, या राज्यांना गरजेनुसार 1000 कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरून शुक्रवारी दुपारी 3 ते शनिवारी सकाळी 8 पर्यंत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय सुमारे 300 हून अधिक रेल्वेगाड्या आज रद्द करण्यात आल्या आणि काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.12 लाख लोक सुरक्षित ठिकाणीप्रचंड वेगाने आलेले चक्रीवादळ सकाळी 8 वाजता पुरीच्या समुद्र किना-यावर धडकले. या वादळाआधीच राज्य सरकारने 12 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. पुरी व आसपासच्या परिसरात ताशी 175 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यांचा वेग पुढे 200 किमी झाला. त्यामुळे रस्ते, घरे, झोपड्या व वृक्ष यांचे मोठे नुकसान झाले. वादळासोबतच्या मुसळधार पावसाने अनेक गावे, छोटी शहरे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.
ओडिशात 'फनी' चक्रीवादळानं 8 जणांचा मृत्यू, आता प. बंगालला धडकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 8:19 AM