पुरी - ओडिशामध्ये गेल्या दोन दिवसांपासून आलेल्या तुफान चक्रीवादळाचा तडाखा राज्याला बसला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी फनी वादळामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भुवनेश्वरला पोहचल्यानंतर त्याठिकाणी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांचे स्वागत केले.
फनी वादळामुळे तडाखा बसलेल्या जागांची हवाई पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टरमधून केली. फनी वादळाच्या तडाख्यामधून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वादळाचा सामाना करण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चांगले काम केले आहे. प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली आहे. केंद्र सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारसोबत आहे.
फनी वादळाचा तडाखा ओडिशा येथील 11 जिल्ह्यातील 14, 835 गावांना बसला आहे. मागील 24 तासात 13.41 लाखांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील आपत्कालीन परिस्थिती पाहता मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्रभावित झालेल्या लोकांना विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. नवीन पटनायक यांनी ''तीव्र' फटका बसलेल्या खुर्दा जिल्ह्याच्या उर्वरित भागातील कुटुंबांना तांदळाचा एक महिन्याचा कोटा, 1 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार आहेत. वादळाचा 'कमी' फटका बसलेल्या कटक, केंद्रपाडा व जगतसिंगपूर हे जिल्हे तांदळाचा एक महिन्याचा कोटा आणि 500 रुपये मिळण्यास पात्र राहतील' असे म्हटले आहे. तसेच फनी या चक्रीवादळामुळे पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी 95100 रुपये तर कमी नुकसान झालेल्या घरांसाठी 5200 रुपये आणि किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी 3200 रुपयांची मदत देण्याचीही घोषणा पटनायक यांनी केली आहे.
ममता यांच्याकडून पंतप्रधान कार्यालयाला माहिती नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क झाला नाही. ओडिशाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल राज्याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र पश्चिम बंगालमधील प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याची माहिती पीएमओच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील फनी वादळासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करण्याऐवजी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना फोन करुन परिस्थीतीचा आढावा घेतला.