नवी दिल्ली : गुलाब चक्रीवादळ ( cyclone gulab ) आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याने रविवारी दिली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारपासून दक्षिण आणि किनारपट्टी भागात पाऊस सुरू झाला आहे. चक्रीवादळ पुढील तीन तासांत आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि ओडिशामधील गोपालपूर दरम्यानची किनारपट्टी ओलांडेल, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार ढगांनी किनारपट्टीचे क्षेत्र व्यापले आहे आणि अशा प्रकारे आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टी चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील तीन तासांमध्ये चक्रीवादळ कलिंगपट्टणममधील किनारपट्टी ओलांडेल आणि गोपालपूर, कलिंगपट्टणमच्या उत्तरेस सुमारे २५ किमी पुढे सरकेल. किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकल्याने ९० किमी प्रति तास वेगाने वेग वाहत आहेत.
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दोन मच्छिमारांचा रविवारी संध्याकाळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाच्या धडकेत मृत्यू झाला, तर एक अद्याप बेपत्ता आहे. तर इतर तीन मच्छीमार किनाऱ्यावर सुरक्षितपणे येऊ शकले आणि त्यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री एस अप्पाला राजू यांना अक्कुपल्ली गावातून बोलावून त्यांच्या सुरक्षेची माहिती दिली.
महाराष्ट्रात पावसाची शक्यतामहत्त्वाचे म्हणजे हे चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जर का ही शक्यता खरी ठरल्यास राज्यात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान बऱ्यापैकी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. वेगाने वारे वाहतील. कोकणात २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान वा-याचा वेग वाढेल. काही ठिकाणी मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल.
मोदींकडून मदतीचे आश्वासनपंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. तसेच चक्रीवादळ 'गुलाब' मुळे निर्माण होणाऱ्या कुठल्याही परिस्थितीचा सामना करणाऱ्यासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण मदत करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.