चेन्नई : मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशात ‘मिचाँग’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याची चुणूक रविवारी रात्री आणि सोमवारी चेन्नईला अनुभवायला मिळाली. तुफानी मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत आणि निवासी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. यामुळे शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत, तर विमान आणि रेल्वेसेवाही विस्कळीत झाली.
एका व्हायरल व्हिडीओत तर पुराच्या पाण्यामुळे रस्त्यावर मगरी फिरत असल्याचे आणि कार तरंगताना दिसून आल्या. अनेक रस्त्यांवर पाच फुटांपर्यंत पाणी आले होते. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने या भागात झोडपून काढल्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये वीज आणि इंटरनेट खंडित झाले. चेन्नई, नजीकच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतही जोरदार पाऊस झाला.
टांझानियामध्ये महापुरामुळे ४७ ठारनैरोबी : उत्तर टांझानियामध्ये महापूर आणि भूस्खलनात किमान ४७ लोकांचा मृत्यू झाला तर ८५ जण जखमी झाले आहेत. पुरात अडकलेल्या शेकडो लोकांना वाचवण्यासाठी सरकारने लष्कर तैनात केले आहे. पूर्व आफ्रिकन देशात आलेली ही आपत्ती गेल्या अनेक वर्षांतील सर्वात धोकादायक आहे.
आज लँडफॉल होणार...चक्रीवादळ मिचाँग बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात, पुद्दुचेरीच्या अंदाजे २१० किमी पूर्व-ईशान्येस आणि चेन्नईच्या १५० किमी पूर्व-आग्नेयेस होते. वादळ उत्तर-वायव्य दिशेकडे सरकताना आणखी तीव्र होणे अपेक्षित आहे. ५ डिसेंबरच्या दुपारच्या सुमारास आंध्रतील नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान तीव्र चक्रीवादळ धडकणे (लँडफॉल) अपेक्षित आहे.
नेमका काय झाला परिणाम?पावसामुळे चेन्नई विमानतळावर पाणी साचल्याने कामकाज सोमवारी सकाळपासून थांबले असून मंगळवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. १२ देशांतर्गत विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, एका खासगी वाहकाने दुबई आणि श्रीलंकेच्या विमानासह चार आंतरराष्ट्रीय सेवा रद्द केल्या आहेत, तर तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंगळुरूला वळवण्यात आली. रेल्वेने तामिळनाडूला जाणाऱ्या आणि येणाऱ्या एकूण २०४ गाड्या रद्द केल्या आहेत.
६ डिसेंबरपर्यंत तीव्र...मिचाँग चक्रीवादळ येत्या २४ तासांत धडकण्याची (लँडफॉल) शक्यता असल्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश हाय अलर्टवर आहेत. चेन्नईने आधीच शाळा बंद केल्या आहेत. किनारी भाग ओसाड झाला आहे. तामिळनाडूला पावसाचा तडाखा बसेल, तर आंध्र प्रदेशात कहर होईल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. हे चक्रीवादळ ६ डिसेंबरपर्यंत तीव्र राहणार आहे.