बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेकडील दाबाचे क्षेत्र गुरुवारी तीव्र होऊन मोचा या चक्रीवादळाचे रूप धारण केले. मोचा चक्रीवादळ गेल्या सहा तासांत वायव्येकडे सरकल्याचे दिसून आले आणि ते पूर्ण चक्री वादळात तीव्र झाले. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग ताशी आठ किमी होता. मोचा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूर्व भारतातील राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
एनडीआरएफच्या तीन तुकड्या पूर्व मिदनापूरमध्ये तैनात आहेत. त्यांना रामनगर १ ब्लॉक, रामनगर २ आणि हल्दिया येथे तैनात करण्यात आले आहे. उर्वरित दोन संघ दक्षिण २४ परगणामधील गोसाबा कुलतली आणि काकद्वीप येथे तैनात करण्यात आले आहेत. उत्तर २४ परगणामधील हिंगलगंज आणि संदेशखळी येथे एक टीम अलर्ट मोडमध्ये आहे. वादळाची तयारी पूर्ण झाली आहे. तटरक्षक दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तटरक्षक आपत्ती निवारण दल तयार करण्यात आले आहे, जे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात सक्रिय झाले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेले दाबाचे क्षेत्र चक्रीवादळ बनत आहे. १२ मे रोजी दुपारपर्यंत त्याचे रूपांतर अतिशय धोकादायक वादळात होईल. हे चक्रीवादळ १४ मे रोजी सकाळी बांगलादेशच्या कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या कुकप्यूला धडकण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीवर धडकताना मोचाचा वेग ताशी १३० किलोमीटर असणार आहे. मात्र, पश्चिम बंगालवर त्याचा परिणाम अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र बंगाल सरकारने किनारी भागात आधीच तयारी सुरू केली आहे. स्थानिक प्रशासनाला तातडीने आवश्यक व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याने दिलेली माहिती अशी, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडू शकतो. अंदमान आणि निकोबार बेटावरील मच्छिमारांना १३ मे पर्यंत समुद्रात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. चक्रीवादळाचे वातावरण लक्षात घेऊन जहाजांनाही समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.