भारतीय हवामान खात्याने मंगळवारी चक्रिवादळाबाबत एक चिंता वाढणवारी माहिती दिली आहे. हवामान खात्याने सांगितले की, ६ मे च्या सुमारास दक्षिण पूर्व बंगालच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार होण्याची आणि त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. २०२३ मधील पहिलं चक्रिवादळ मे महिन्यात येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ६ मे रोजी बंगालच्या उपसागरावर चक्रिवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्याबाबत आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, काही प्रणालींनी हे यक्रिवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत. तसेच नियमितपणे अपडेट उपलब्ध करून दिली जाईल. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या शक्यतेनंतर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अधिकाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना दिली आहे.
आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चक्रिवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांनी या आठवड्याच्या अखेरीपर्यंत दक्षिण बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचं क्षेत्र बनू शकतं.. संशोधकांनी सांगितलं की, कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रिवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता अधिक आहे. या चक्रिवादळाचा प्रभाव पूर्व भारतापासून बांगलादेश आणि म्यानमारपर्यंत पडण्याची शक्यता आहे. या चक्रिवादळाचं नाव मोचा असेल. हे नाव येमेनमधील मोचा या बंदरावरून पडलं आहे.