नवी दिल्ली: अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे (Cyclone Mocha) तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ सध्या कॉक्स बाजारच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ७०० किमी अंतरावर आहे. गेल्या ६ तासात हे चक्रीवादळ १७५ किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे हळूहळू सरकत आहे. हे वादळ आज दुपारच्या सुमारास कॉक्स बाजार (बांग्लादेश) आणि क्यवप्यूमधील (म्यानमार) किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे.
मोचा या शक्तिशाली चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश आणि म्यानमारमधील अधिकाऱ्यांनी किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आणि किनारी भागांपासून दूर राहण्याचा इशारा दिला. हे वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर धडकेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी बांगला देश आणि म्यानमारने तयारी केली असून, किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये NDRF तैनात-
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा येथील बक्खली बीचवर नागरी संरक्षण दल तैनात करण्यात आले आहे. नागरी संरक्षण अधिकारी अनमोल दास म्हणाले, "परिस्थिती चांगली नाही. आम्ही लोकांना आणि पर्यटकांना सतत सतर्क राहण्याचा आणि समुद्रकिनाऱ्यावर येण्याचे टाळण्याचा इशारा देत आहोत." यापूर्वी, चक्रीवादळ 'मोचा' चे तीव्र वादळात रूपांतर होण्याचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) पश्चिम बंगालच्या दिघामध्ये ८ टीम आणि २०० बचाव कर्मचारी तैनात केले आहेत.
८ ते १२ फूट उंचीपर्यंत लाटा उसळणार-
चक्रीवादळातून ८ ते १२ फूट उंचीच्या लाटा उसळू शकतात. उत्तर म्यानमारच्या सखल भागात पूर, भूस्खलनाची भीती देखील वर्तवण्यात आली आहे. चितगाव बंदरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय विद्यापीठात रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.