नवी दिल्ली - पश्चिम बंगाल आणि ओडिशातील अम्फान चक्रीवादळानंतर अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळमहाराष्ट्रात धडकले आहे. ताशी 100 किलोमीटरहून अधिक वेगाने चक्रीवादळाने रायगडमधल्या अलिबाग, श्रीवर्धनला धडक दिली. या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांतील घरांचे पत्रे उडून गेले आहेत. थोड्याच वेळात चक्रीवादळ मुंबई, ठाण्याला धडक देण्याची शक्यता आहे. मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडल्यानं वाहनांचं, घरांचं, दुकानांचं नुकसान झालं आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा वेग आणि त्याचा प्रभाव पाहता पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक ट्विट केलं आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांना या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. 'निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जनतेच्या वतीने महाराष्ट्रातील जनता आणि तुम्हाला पूर्ण पाठिंबा दर्शवत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत' असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
केजरीवालांनी अपल्या ट्विटर अकाऊंटवरून बुधवारी (3 जून) हे ट्विट केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. अरविंद केजरीवाल यांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद अस ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. लोकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलिस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डचे तैनात करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच ट्रॅफिक विभागाकडून ट्रॅफिकमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अरबी समुद्रातील चक्रीवादळ पणजीपासून 280 किमी, मुंबईपासून 430 किमी आणि सुरतपासून 640 किमी अंतरावर होते. ताशी 11 किलोमीटर या वेगाने ते उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढच्या बारा तासांमध्ये याचा वेग आणखी वाढेल. आज दुपारी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्याचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग ओलांडले आहे. यावेळी येथे ताशी 120 किमी वेगाने वारे वाहत असून किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : नववीतल्या विद्यार्थ्यानं तयार केली वेबसाईट; कोरोनाच्या खात्रीशीर माहितीचं संकलन
CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?