अहमदाबाद - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे वायू चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 13 जून रोजी गुजरातच्या पोरबंदर आणि कच्छ या परिसरात वायू वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात प्रशासन या वादळापासून लोकांना वाचविण्यासाठी सज्ज आहे. आपतकालीन परिस्थितीमध्ये 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफ टीमने कंबर कसली आहे. दोन महिन्यांपूर्वी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही फनी वादळाचा तडाखा बसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
मुंबईहवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, वायू चक्रीवादळ जलदगतीने मुंबई किनाऱ्यापासून 280 किमीपर्यंत पोहचलं आहे. त्यामुळे समुद्रकिनार पट्ट्यामध्ये दिवसभार सोसाट्याचा वारा वाहणार आहे. आज आणि उद्या समुद्रकिनार पट्ट्यामध्ये वायू चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. वादळी वारा आणि पावसाच्या धारा काही भागात पडतील. तर मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या दुर्घटनाही घडू शकतील. चक्रीवादळ पुढे सरकत असताना पोरबंदर, महुआ, वेरावल आणि दीव येथे चक्रीवादळामुळे तुफान पाऊस होईल
वायू चक्रीवादळ 110-135 किमी प्रतिवेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. हवामान विभागाकडून सौराष्ट्र आणि कच्छ विभागात रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे कमकुवत घरे, इमारतींचे नुकसान, वीजप्रवाह खंडीत होणे, सखळ भागात पाणी साचणे अशाप्रकारे नुकसान होऊ शकतं.
वायू चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर अशा परिसरांना बसू शकतो. सौराष्ट परिसरातील 10 जिल्ह्यामधील 408 गावांमध्ये राहणाऱ्या 60 लाख लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. रेस्क्यू ऑपरेशनसाठी राज्य सरकारकडून लष्कराच्या 10 तुकड्या पश्चिम किनाऱ्यांवर तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच एनडीआरएफ टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे. तसेच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांना सुरक्षितस्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे.