Cyclone Vayu Update : धक्कादायक ! पाळण्यासह दीड वर्षांचा मुलगा वादळात उडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 02:18 PM2019-06-13T14:18:55+5:302019-06-13T14:19:57+5:30
वायू वादळाची चाहूल गुजरातच्या किनाऱ्यावर लागली आहे.
बडवानी : मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यामध्यें बुधावारी रात्री आलेल्या जोरदार वादळामुळे दीड वर्षांचा मुलगा झोपाळ्यासह उडून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला.
वायू वादळाची चाहूल गुजरातच्या किनाऱ्यावर लागली आहे. यातच मान्सूनपूर्व पावसाने दुष्काळाने होरपळणाऱ्या भागात हजेरी लावली खरी मात्र वादळी वाऱ्यामुळे हा आनंद अनेक ठिकाणी विरला आहे. वादळ वाऱ्यामध्ये अनेकांच्या घरांची छपरेच उडून गेली आहेत. भोपाळसह मध्य प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
बडवानीचे पोलिस अधिकारी संतोष सांवले यांनी सांगितले की, फोगरा आणि त्यांची पत्नी वलन गावातील त्यांच्या झोपडीवजा घरामध्ये राहतात. पत्र्याच्या झोपडीच्या छताला झोपाळा टांगला होता. यामध्ये त्यांचा दीड वर्षांचा मुलगा झोपला होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळाने या झोपडीचे छतच उखडून नेले. या छतासोबत मुलगाही उडाला आणि जवळपास 200 मीटर लांबवर जाऊन पडला. अंधारातच भयभीत झालेल्या दांपत्याने मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा मृत झाला होता. यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
भोपाळसमवेत ग्वाल्हेर, चंबळ, मालवा-निमाड आणि विंध्यच्या काही भागामध्ये गडगडाटासह वीजा चमकल्या. भोपाळमध्ये 1.4 अंशांनी तापमान घसरले होते. ग्वाल्हेरमध्ये तर 8.7 आणि दतियामध्ये 10 अंशांनी तापमान घसरले होते. मध्य प्रदेशमध्ये वायू चक्रीवादळाची चाहूल दिसू लागल्याचे हवामान विभागाचे अधिकारी ए के शुक्ला यांनी सांगितले.