अहमदाबाद - वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. गुजरातच्या काही भागांत गुरुवारी ‘वायू’ वादळ धडकणार असल्याने समुद्र किनाऱ्यावरील 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. सौराष्ट्र व कच्छमधील बंदरे व विमानतळांवरे बंद करण्यात आली आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वायू चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. तसेच गुजरातला जाणाऱ्या 70 मेल रद्द करण्यात आल्या आहेत. अहमदाबाद विमानतळ बंद असणार आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही आज धावणार नाहीत.
गुजरातच्या 10 जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसेल, अशी शक्यता आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबई तसेच कोकणपट्टीतील सर्व किनारे लोकांसाठी बंद केले आहेत. खराब हवामानामुळे बुधवारी मुंबई विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले होते. मुंबईत बुधवारी जोरदार वारे वाहत होते. समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली होती. गोवा, मुंबई, कोकणपट्टी तसेच गुजरातच्या समुद्रात मोठ्या लाटा दिसत होत्या. गुजरातच्या अनेक भागांत जोरदार वारे वाहत होते आणि प्रचंड पाऊसही झाला. वाऱ्यांमुळे अनेक झाडे उन्मळून पडली, झाडांच्या फांद्या, विजेचे खांब, जाहिरातींचे होडिंग्ज खाली आले. हे चक्रीवादळ द्वारका व वेरावल दरम्यान ताशी 155 ते 165 किलोमीटर वेगाने धडकेल. गुरुवारी दुपारपर्यंत वेग ताशी 180 किलोमीटर असेल. सौराष्ट्र व कच्छ किनाऱ्यांनाही त्याचा फटका बसेल.
वादळाचा परिणाम हा ते गुरुवारी जमिनीवर धडकल्यानंतरही 24 तास दिसेल. एनडीआरएफच्या 50 तुकड्या गुजरातमध्ये पोहोचल्या असून, लष्कराच्या 10 तुकड्या सज्ज आहेत. युद्धनौका व नौदलाची विमानेही तयार ठेवली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊ न मदत व पुनर्वसनात हयगय होऊ नये, असे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्थानिक यंत्रणाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
70 मेल, एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द
वायू चक्रीवादळाचा फटका सौराष्ट्र, कच्छ, अमरेली, गिर, सोमनाथ, दीव, जुनागढ, पोरबंदर, राजकोट, जामनगर आणि द्वारका या शहरांना बसेल. त्यामुळे पश्चिम मार्गावरून या शहरात जाणाऱ्या 70 मेल, एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून 28 मेल, एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अतिदक्षता म्हणून विशेष मेल, एक्स्प्रेस न चालविण्याचा निर्णय घेतला आहे. किनारपट्टी भागातील प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी राजकोट विभागातून एक विशेष गाडी आणि भावनगर विभागातून दोन विशेष गाड्या चालविण्यात आल्या. चक्रीवादळामुळे एकूण 98 गाड्यांवर परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिकारी नेमले आहेत.
चर्चगेटमध्ये होर्डिंगची सिमेंटशीट कोसळून ज्येष्ठाचा मृत्यू
मान्सून अद्याप कर्नाटकच्या वेशीवरच असला तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाच्या पावसाने मुंबईकरांची दैना उडविली आहे. बुधवारी मुंबईत चक्रीवादळाचे वारे वेगाने वाहत असताना चर्चगेट रेल्वे स्थानकावरील होर्डिंगची सिमेंटशीट कोसळून मधुकर अप्पा नार्वेकर (62) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तर, वांद्रे येथील स्कायवॉकचा काही भाग कोसळून तीन महिला जखमी झाल्या. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू या चक्रीवादळाने आपला रोख गुजरातकडे वळविला असला तरी याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर पावसाचा मारा सुरू आहे. बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबईकरांना सूर्यदर्शन झाले; त्यानंतर मात्र मुंबईवर चक्रीवादळाच्या पावसाचे ढग दाटून आले आणि पाऊस सुरू झाला.